5 जुलै नंतर दर रविवारी ‘या’ राज्यात कडक ‘लॉकडाऊन’, वाचा मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ 3 मोठे निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू देशात वेगाने पसरत आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्येही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कर्नाटकमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी साथीच्या आजारावर उपायांसंदर्भात चर्चेसाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई, महसूलमंत्री आर अशोक, मुख्य सचिव टीएम विजय भास्कर आणि बीबीएमपी आयुक्त बी.एच. अनिल यांच्यासह अनेक अधिकारी व मंत्री उपस्थित होते.

बैठकीनंतर महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही कडक पावले उचलण्याची योजना आखत आहोत. आम्ही सेकंडरी स्कूल लिविंग सर्टिफिकेट परीक्षा समाप्त होण्याची वाट पाहत आहोत. त्यानंतर काही कडक पावले उचलली जातील. ते म्हणाले की आज कोरोनावरील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार 5 जुलै नंतर दर रविवारी लॉकडाऊन सुरु करण्यात येईल. 10 जुलैपासून सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांना पाच दिवसच काम करावे लागेल. आता रात्री 8:00 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. यापूर्वी रात्री 9 ते पहाटे 5 पाचपर्यंत कर्फ्यू लागू होता.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
कर्नाटक सरकारच्या पुढील आदेशापर्यंत 5 जुलै 2020 पासून दर रविवारी लॉकडाऊन सुरूच राहील. अत्यावश्यक सेवा आणि पुरवठा वगळता त्या दिवशी इतर कामांना परवानगी दिली जाणार नाही. सरकारच्या पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन कायम राहील.

आयुक्त, बीबीएमपी यांना शहरातील मोठ्या घाऊक भाजीपाला बाजारपेठेत जास्त गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात घाऊक भाजीपाला बाजारपेठा स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड -19 च्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी केंद्रीकृत बेड वाटप प्रणाली तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बंगळुरुमध्ये 10 हजार खाटांची कोविड -19 केअर सुविधा सुरू होणार आहे
कर्नाटकात कोविड -19 च्या वाढत्या घटनांमध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री एस. सुधाकर यांनी शनिवारी सांगितले की सोमवारी संध्याकाळपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी 10 हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि बहुमजली निवासी इमारतींचा वापर संक्रमणांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे.