नववर्षाचं स्वागत ‘या’ पध्दतीनं करा ! राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेकांकडून नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. थर्टी फस्टला अनेक ठिकाणी गर्दी होणार ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने रात्री 11 ते पहाटे 6 या कालावधीत नाईट कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे यंदा नववर्षाचं स्वागत करायचे तरी कसे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सरकारची मार्गदर्शक सूचना
1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाच स्वागत घरातच साधेपणाने करावे.
2. 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग राहील याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
3. खासकरून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील नागरिकांची गर्दी होत असते. या दृष्टीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षा खालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर पडू नये.
5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढू नयेत.
6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता समाजिक अंतराचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
9. याशिवाय 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी याचे पालन करावे असे गृ विभागकडून आवाहन करण्यात आले आहे.