खुशखबर ! ‘कोरोना’च्या विरूद्ध लढा देताना देशाला ‘या’ 3 टप्प्यावर मिळतेय ‘यश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाविरोधात लढताना देशाच्या दृष्टीने एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे. या लढाईत भारताला, कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि डेथ रेट या तीन महत्त्वाच्या पायऱ्यांवर यश मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाबाबतची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी या तिन्हीचेही वेगवेगळे आकडे समोर ठेवले असून यावरून कोरोना विरोधातातील लढाईत भारताला मोठे यश मिळत असल्याचे स्पष्ट होते.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल पत्रकार परिषदेत म्हटले की, कोरोना बाधितांच्या डबलिंग रेटचा विचार केला तर लॉकडाऊनपूर्वी देशातील डबलिंगचा रेट 3.4 दिवस असा होता. तो वाढून आता 11 दिवस झाला आहे. यापेक्षा अधिक चांगली गोष्ट म्हणजे, काही राज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 11 ते 20 दिवसांचा डबलिंग रेट आहे. कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांचा डबलिंगचा रेट 20 ते 40 दिवस आहे. तर आसाम, तेलंगणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशाता हाच रेट 40 दिवसांपेक्षाही जास्त आहे.

78 टक्के मृतांमध्ये इतर आजार
अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, देशात आतापर्य़ंत 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 टक्के पुरुष तर 35 टक्के महिलांचा समावेश आहे. वयाचा विचार करता 45 पेक्षा कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षाच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षाहून अधिक वय ज्यांचे आहे अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 60-75 वयोगटातील 42 टक्के, 75 पेक्षा अधिक वय असलेल्या 9.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की, मृत झालेल्यांपैकी 78 टक्के लोकांमध्ये इतर कोणतेना कोणते आजार होते आणि त्या आजाराने ते ग्रासलेले होते. आतापर्य़ंत देशात 1074 जणांचा मृत्यू झाला आहे.

रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 1823 नवे रुग्ण आढळले असून देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33610 झाली आहे. यापैकी 24162 अॅक्टीव्ह आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. देशात आतापर्य़ंत 8373 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशा प्रकारे, देशातील रिकव्हरी रेट वाढून 25.19 टक्क्यांवर पोहचला आहे. 14 दिवसांपूर्वी रिकव्हरी रेट केवळ 13.06 टक्के होता. यावरून स्पष्ट होते की देशतील रिकव्हरीच्या बाबतीत देखील यश मिळत आहे.