दुर्दैवी ! कोरोनामुळे अवघ्या 12 तासात आई अन् मुलीचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असतानाच राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोरोनाची बाधा झाल्याने अवघ्या 12 तासात आई अन् मुलीचा मृत्यू झाला आहे. आईला अग्नी देत असताना दुसरीकडे मुलीनेही आपला जीव सोडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बद्रीबाई (वय 45), संगिता (वय 25) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. संगीता जयपूर येथून बी. टेक सिव्हिल इंजिनिअरिंग शिकली होती. कोरोनामुळे तीचे लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. संगीताची आई बद्रीबाई एका महिन्यापूर्वी लग्नाच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून परत आल्यावर त्या आजारी पडल्या होत्या. त्यांना कोटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मुलगी संगीतालाही रुग्णालयात होती. यावेळी मुलीची तब्येतही खालावली. जवळपास 12 दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काळाने घात केला आणि दोन्ही मायलेकींनी प्राण सोडला.