Coronavirus : घाबरू नका, पण काळजी आवश्यक घ्या अन् सावध राहा ! दुसर्‍या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक माहिती

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला आहे. दररोज हजारोंच्या संख्येत लोक बाधित आढळून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावावे लागले आहेत. तर काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनदेखील केला आहे. प्रशासनाकडून कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. देशात कोरोनाचे संकट गडद होत असतानाच आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दिलासादायक बातमी दिली आहे.

अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) केलेल्या अभ्यासानुसार पृष्ठभागावरून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. दहा हजारांपैकी एक प्रकरण असं असतं, ज्यात कोरोना पृष्ठभागावरून पसरतो. त्यामुळे कोरोना पृष्ठभागावरून पसरेल याबाबत कोणीही फार घाबरू नये असेही सीडीसीने सांगितले आहे.

कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी जगभरात हॉटेल, रुम, ऑफिस, शाळा, गाड्या, रेस्टॉरंट अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी अनेक कडक निर्बंधाबरोबरच सॅनिटाइस केली जात आहेत. मात्र, जागितक स्तरावर सीडीसीने दिलेल्या माहितीमुळे मोठा परिणाम होणार आहे.

यासंदर्भात बोलताना सीडीसीचे संचालक रोशेल वॅलेन्स्की म्हणाले की, कोरोना विषाणू पृष्ठभागावर असेल आणि त्याच्या संपर्कात कोणी आले तर ते लोक संक्रमित होऊ शकतात. मात्र, हा दर खूपच कमी असतो. कोरोनाचा संसर्ग हा पृष्ठभागावरून नाही तर एकमेकांच्या संपर्कातूनच होतो अशी सीडीसीच्या गाइडलाइन आहेत.