Covid-19 in India : देशात 24 तासात सापडले 21,822 नवीन रूग्ण आणि 299 मृत्यू, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढला ‘स्ट्रेस’

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 66 हजार केस झाल्या आहेत. मागील 24 तासात 21 हजार 822 लोक कोरोन संक्रमित आढळले. या दरम्यान 26 हजार 139 रूग्ण बरे झाले. तर 299 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकुण 98 लाख 60 हजार लोकांनी कोरोनावर(Coronavirus) मात केली आहे. या व्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत 1 लाख 48 हजार 738 लोकांनी जीव गमावला आहे. एकुण अ‍ॅक्टिव्ह केस कमी होऊन 2 लाख 57 हजारवर आल्या आहेत.

पुण्यात युकेहून आलेले 109 जण बेपत्ता
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्यादरम्यान देशात एक महिन्यात ब्रिटेनहून परतलेल्या सुमारे 33 हजार लोकांनी सरकारची अस्वस्थता वाढवली आहे. बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांमध्ये युकेहून आलेल्या लोकांचा शोध लागलेला नाही. अनेक प्रवाशांनी पत्ता आणि नंबर चुकीचा सांगितलेला आहे, ज्यामुळे ट्रेसिंगमध्ये अडचण येत आहे. पंजाबमध्ये सर्वात जास्त 3 हजार 426 लोक ब्रिटनहून परतले, यापैकी 2 हजार 426 ट्रेस झालेले नाहीत. तर, महाराष्ट्रात 1200 पेक्षा जास्त लोक परतले, ज्यापैकी पुण्यातील 109 लोक बेपत्ता आहेत.

महाराष्ट्रात सापडले 3537 नवे रूग्ण
महाराष्ट्रात बुधवारी 3537 लोक संक्रमित आढळले. 4913 लोक बरे झाले आणि 90 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19.28 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 18.24 लाख रूग्ण बरे झाले आहेत. 49 हजार 463 जणांचा आतपर्यंत मृत्यू झाला, तर 53 हजार 66 रूग्णांवर उपचार सुरू आहे.