Coronavirus : ‘कोरोना’च्या विळख्यात राजकीय नेते, आठवडयाभरात HM अमित शहा यांच्यासह ‘या’ 8 दिग्गजांना लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील कोरोनाचा वेग खूप वाढला आहे. पूर्वी काही हजार प्रकरणे समोर येत होती, पण आता हा आकडा ५० हजाराच्या आसपास पोहोचला आहे. एका अभ्यासानुसार, जुलै महिन्यात दर तासाला २५ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. ही आकडेवारी अतिशय धोकादायक आहे. कोरोना असा आहे की तो कोणालाही होऊ शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह होणे हा याचाच पुरावा आहे. आठवड्याभरातील आकडेवारी पाहिल्यास अनेक मोठ्या व्यक्ती कोरोना संक्रमणाला बळी ठरल्या आहेत. त्यापैकी नवीन नाव अमित शहा यांचे आहे, तर तामिळनाडूचे राज्यपाल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्रीही या यादीमध्ये समाविष्ट आहेत.

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी त्यांना संसर्ग असल्याचे समजले. खुद्द अमित शहा यांनी संक्रमणाची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जेथे ते पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांची तब्येतही सामान्य आहे.

बीएस येडियुरप्पा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी त्यांचा कोरोना अहवाल समोर आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की जे लोक त्यांच्या संपर्कात होते त्यांनी त्यांची चाचणी अवश्य करावी. येडियुरप्पा यांच्यानंतर त्यांची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तिला बंगळुरूच्या मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमल राणी वरुण

उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. १८ जुलै रोजी कोरोना संसर्गानंतर लखनऊला एसजीपीजीआय मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. परिस्थिती सतत खालावत गेली आणि रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

स्वतंत्र देव सिंह

यूपी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे देखील रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. स्वत: स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची पुष्टी केली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. अहवाल येईपर्यंत लोकांना होम क्वारंटाइन होण्याचाही सल्ला दिला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘मला कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसत होती, त्यामुळे मी माझी कोविड-१९ ची चाचणी केली. माझा अहवाल तपासात पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो की, मार्गदर्शक सूचनांनुसार स्वत:ला क्वारंटाइन करा आणि आवश्यकतेनुसार आपली तपासणी करा.’

डॉक्टर महेंद्र सिंह

यूपी सरकारमधील जलऊर्जा मंत्री महेंद्र सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. योगी सरकारमधील सहा मंत्री कोरोना संक्रमित आढळले आहेत. गेल्या महिन्यात क्रीडामंत्री उपेंद्र तिवारी हे कोरोना संक्रमित आढळले होते. उपेंद्र तिवारीपूर्वी योगी सरकारमधील इतर तीन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र प्रताप सिंह, धरम सिंह सैनी आणि चेतन चौहान यांचीही नावे कोरोना बाधित मंत्र्यांच्या यादीत आहेत.

बनवारी लाल पुरोहित

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना राजभवनातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात केली गेली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

कार्ती चिदंबरम

तामिळनाडूचे कॉंग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी एका ट्विटमध्ये कोरोना संसर्गाची माहिती दिली. कार्ती यांनी लिहिले, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी होम क्वारंटाइन आहे.

शिवराज सिंह चौहान

नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. ते चिरायू रुग्णालयात दाखल आहेत. उपचारादरम्यान केलेल्या चाचण्यांमधून असे दिसून येते की, त्यांना कोरोनाचे किरकोळ संक्रमण आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले होते की, जो कोणी त्यांच्या संपर्कात आला असेल त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी. त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यावर चाचणी केली होती.