कशी असणार चीनमध्ये तयार केलेली ‘कोरोना’ वॅक्सीन, चीननं पहिल्यांदाच जगाला दाखवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने पहिल्यांदाच त्यांच्या देशात तयार केलेली कोरोना वॅक्सीन एका ट्रेड फेयर मध्ये प्रदर्शित केली. सोमवारी बीजिंगमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये चिनी कंपनी सिनोवेक बायोटेक आणि सिनोफार्मच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वॅक्सीन प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. अद्याप दोन्ही वॅक्सीन बाजारात आल्या नाहीत.

सिनोवेक बायोटेक आणि सिनोफार्मच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वॅक्सीनचं अनेक देशांमध्ये फेज-3 ट्रायल सुरु आहे. काही रेपोर्टने सांगितलं की चीनमध्ये आधीच काही लोकांना ही वॅक्सीन देण्यात आली आहे.

सिनोवेक कंपनीच्या एका अधिकाऱ्याने AFP ला सांगितलं की, कंपनीने आधीच फॅक्टरीची निर्मिती पूर्ण केली आहे जी एका वर्षात वॅक्सीनचे 30 कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहे.

बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ट्रेड फेयर मध्ये वॅक्सीन पाहण्यासाठी अनेक लोक आले होते. कोरोना विषाणूमुळे चीनला जगातील अनेक देशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. पण चीन आपली प्रतिमा बदलण्याच्या तयारीत आहे. मे महिन्यात चीनचे राष्ट्रपती शी झिनपिंगने सांगितलं होतं की चीनमध्ये विकसित होणारी वॅक्सीन जनतेच्या भल्यासाठीच असेल.

सिनोफार्म कंपनीने सांगितलं की त्यांनी तयार केलेल्या कोरोना वॅक्सीनमुळे तयार झालेल्या अँटीबॉडी शरीरात 1 ते 3 वर्षांपर्यंत राहतात. अजूनही फायनल रिझल्ट बाकी आहे. मागील महिन्यात चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सांगितलं होतं की वॅक्सीनची किंमत खूप जास्त असणार नाही.