गरोदर डॉक्टर ‘कोरोना’ विरुद्धची लढाई हारली, तिच्या पतीने तिचा शेवटचा व्हिडीओ केला व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने कोणत्याही वयोगटाला सोडलेलं नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती कोरोना संग्रमित होत आहेत. सरकारकडून लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, गर्भवती महिलांना लस देता येत नसल्याने गर्भवती महिलांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र कोरोना विषाणू कुणालाही सोडत नाही की कुठलाही भेदभाव करत नाही. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका गरोदर डॉक्टर महिलेला आपल्या पोटातील बाळासहीत आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही घटना नुकतीच समोर आली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने तिचा शेवटचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. शेवटच्या व्हिडीओमध्ये महिला डॉक्टरने सर्वांना एक संदेश दिला आहे. लोकांनी जबाबदारीनं वागावं असा संदेश महिला डॉक्टरने दिला आहे.

दातांची डॉक्टर असलेल्या डॉ. डिंपल अरोरा चावला यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना विरुद्ध त्या लढा देत होत्या. अखेर कोरोनापुढे त्यांचे देखील काही चालले नाही. त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. केवळ डॉ. डिंपल यांचाच नाहीतर अद्याप या जागात पाऊल देखील न टाकलेल्या बाळाचा देखील या युद्धात पराभव झाला. डॉ. डिंपल या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. एप्रिल महिन्यात त्या कोरोना संक्रमित असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले होते. दोन आठवड्यानंतर 34 वर्षीय डिंपल यांनी आपल्या पोटातील भ्रूणाला गमावलं आणि पुढच्याच दिवशी डिंपल यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. पती आणि तीन वर्षांच्या मुलाला सोडून डॉ. डिंपल यांनी जगाचा निरोप घेतला.

कोरोना संक्रमित झाल्यानंतर दहा दिवसांनी 21 एप्रिल रोजी त्यांची ऑक्सिजन पातळी घसरण्यास सुरुवात झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रेमडेसिविर तसेच दोन वेळा प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. 25 एप्रिल रोजी त्यांना प्रसववेदना जाणवू लागल्या. अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भवती बाळाचं हृदय बंद झाल्याचे स्पष्ट झाले. गर्भातच बाळाचा मृत्यू झाला होता. आईला इजा होऊ नये यासाठी डॉक्टरांनी सीझेरियन करुन गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. डिंपल यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचे पती रविश चावला यांनी दिली.

मृत्यूपर्वी डॉ. डिंपल यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठी एक व्हिडीओ संदेश दिला होता. यामध्ये त्यांनी घातक विषाणूला मस्करीत न घेण्याचा सल्ला दिला होता. हा व्हिडीओ त्यांचे पती रविश यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोविडमुळे मी माझ्या पत्नीला आणि या जगात पाऊलही न ठेवणाऱ्या बाळाला गमावलंय. मात्र, पत्नी डिंपल यांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी आणि कोविडविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण त्यांचा हा अखेरचा व्हिडीओ शेअर करत असल्याचे रविश चावला यांनी म्हटले.

या व्हिडीओमध्ये डॉ. डिंपल म्हणातात. कोविडला हलक्यात घेऊ नका. घरात किंवा घराबाहेर इतरांशी गप्पा मारताना मास्कचा वापर करा. जबाबदारीनं घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी याची काळजी घ्या. आपल्या घरात लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. मी त्याचा सध्या अनुभव घेतेय. अशा पद्धतीच्या त्रासातून कधीही गेले नव्हते, असे म्हणत त्यांनी लोकांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे.