…म्हणून आरोग्य मंत्र्यांनी मानले शाहरूख खानचे ‘आभार’ !

पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला असल्यामुळे मदतीसाठी सर्वसामान्य व्यक्तींसोबतच व्यावसायिक आणि कलाकारही पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत अनेक जणांनी गरजूंना आर्थिक मदतीसोबतच शिधादेखील पुरवला आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचादेखील सहभाग आहे. अभिनेता शाहरुख खानने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदतीसह साडेपाच हजार नागरिकांना शिधा पुरविला होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्र सरकारला 25 हजार ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई) कीट पुरविल्या आहेत. या मदतीमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शाहरुख खानचे आभार मानले आहेत.

राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बाधितांवर थेट उपचार करणार्‍या डॉक्टरांसाठी पीपीई कीट आवश्यक होते. डॉक्टरांना पीपीई कीटची कमतरता भासू नये यासाठी शाहरुखने तब्बल 25 हजार पीपीई कीट पुरवून मदत केली आहे.

यासंदर्भात राजेश टोपे यांनी शाहरुख खान यांनी 25 हजार पीपीई कीट देऊन जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल, असे ट्विट आरोग्य मंत्री टोपे यांनी केले आहे. त्यानंतर शाहरुखनेदेखील त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. शाहरुखने आतापर्यंत विविध मार्गाने या संकटकाळी मदतीचा हात पुढे केला आहे. शाहरुख खानने 2 एप्रिल रोजी कोरोनाशी लढा देण्यासाठी पुढाकार घेत मदत जाहीर केली होती. यावेळी त्यांनी आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिल्लीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX कडून सात संस्थांना निधी देत असल्याचे जाहीर केले होते.