Coronavirus : डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रूग्णानं व्हिडीओव्दारे सांगितलं मी जिवंत आहे, Video व्हायरल

उज्जैन : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. देशातही कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन ३ मे नंतरही वाढवण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र मध्य प्रदेश मध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील आरोग्य विभागातील डॉक्टरांनी जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केले. मात्र त्या रुग्णाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मी जिवंत आहे असं म्हटलं आहे. नक्की काय घडले आहे जाणून घेऊया …

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उज्जैनमध्ये घडली आहे. रुग्णाने वर्तमानपत्रात आपल्या मृत्यूची बातमी वाचली आणि त्याला धक्काच बसला. त्याने आपण जिवंत असल्याचा एक व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. आरोग्य विभागाने हा व्हिडीओ पाहिल्यावर संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली आहे. ‘मला दोन दिवसांपूर्वी RDGarD रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी एका वृत्तपत्रात वाचले की मला मृत घोषित करण्यात आले आहे. पण मी जिवंत आणि निरोगी आहे. कृपया हा व्हिडीओ इतरांसोबत शेअर करावा’ असं रुग्णाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वृत्तसमूहाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान , देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.