दिलासादायक ! देशात 6 महिन्यानंतर प्रथमच ‘कोरोना’ नव्या रुग्णांची संख्या 20 हजारापेक्षा कमी

पोलीसनामा ऑनलाईन : आता सरत्या वर्षाला निरोप देताना देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. शात गेल्या 24 तासात 20 हजारांपेक्षाही कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 732 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात 24 तासांत 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 2 लाख 78 हजार 690 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 97 लाख 61 हजार 538 जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 21 हजार 430 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

राज्यातील स्थिती कशी आहे?
दरम्यान राज्यातही कोरोनासंबधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात 2 हजार 854 नवे करोनाबाधित आढळले असून, 60 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 हजार 526 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 16 हजार 236 वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.34 टक्के इतका झाला आहे.