Coronavirus : 3 मे पर्यंत जिल्हाबंदी कायमच ! सर्दी, खोकला, ताप असेल तर लपवू नका, तात्काळ दवाखान्यात जा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रातील देखील परिस्थिती काही प्रमाणात चिंताजनक आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार) दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. सर्दी, खोकला ताप असेल तर नागरिकांनी अजिबात लपवू नये त्यांनी तात्काळ दवाखान्यात जावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात काल (शनिवारी) रात्री पर्यंत कोरोनाच्या 66 हजार 796 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी किमान 95 टक्के रूग्ण निगेटिव्ह आहेत. केवळ 3600 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आतापर्यंत 350 रूग्ण बरे झाले आहेत.

पॉझिटिव्ह रूग्णांपैकी देखील 70 ते 75 टक्के रूग्ण हे अति सौम्य आहेत. एकूण रूग्णांपैकी 52 रूग्ण हे मध्यम गंभीर आणि गंभीर आहेत. राज्यातील विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील ठिकाणी काही अर्टी व शर्तींवर काही सूट देण्यात आली आहे. 3 मे पर्यंत जिल्हा बंदी कायमच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. रेशनिंगकार्डव्दारे धान्य देण्यास सुरवात होत आहे. मुंबई आणि पुण्यातील संकट सोडवायचं आहे असेही त्यांनी सांगितलं. राज्यातील सर्व डॉक्टरांना त्यांनी आवाहन केले आहे. राज्य सरकार कुठल्याही गोष्टींची कमरता भासू देणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. काही किटची कमतरता आहे ती लवकरच सोडवली जाईल. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. अ‍ॅन्टी कोरोना पोलिस ही संकल्पना सर्वांनी राबवा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मला राजकारण करायचं नाही

सीएसआर फंड तिकडं चालतो अन् इकडं चालत नाही. या राजकारणामध्ये मला जायचं नाही. आपण सीएसआर फंडासाठी वेगळं अकाऊंट करून दिलं आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

3 मे पर्यंत लॉकडाऊन कायमच

येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबई आणि पुणे सोडून इतर ठिकाणी काय करता येईल याबाबत आपण विचार करतो आहे. मात्र, सर्व ठिकाणी 3 मे पर्यंत लॉकडाऊन चालूच राहणार आहे. नागरिकांनी घरीच बसावे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. 3 मे पर्यंत जिल्हाबंदी राहणार असून इतर बंधन देखील राहणार आहेत.

परराज्यातील मजुरांना देखील मुख्यमंत्र्यांचं आवाहन

महाराष्ट्रातील परप्रातींय मजुरांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले असून त्यांना कामासाठी विश्वास दिला आहे. राज्य सरकार केंद्राशी समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगता इथं व्यवस्थत आहे. लवकरच मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी परराज्यातील मजुरांना सांगितलं. राज्यातील काम लवकरच सुरू होईल असेही त्यांनी सांगितलं. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा सर्वांना घरापर्यंत पोहचवू असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

महिलांच्या मदतीसाठी 100 नंबर
महिलांनी अत्याचार होत असतील तर त्यांनी तात्काळ 100 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. महिलांनी न घाबरता तात्काळ कॉल करावा असेही ते म्हणाले.

वैफल्यग्रस्त झाल्यास ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

मुंबई मनपा आणि बिर्ला स्वयंसेवी संस्था (1800120820050)
आदिवासी विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई संस्था, प्रफुल्ला (18001024040)