‘व्हेंटिलेटर’वर पती, पत्नीनं ओठांवर ठेवलं ‘पवित्र’ पाणी, दिली गणेश मूर्ती !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या कानन पटेल यांनी कोरोना विषाणूमुळे आजारी असलेल्या आपल्या पतीला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यांना वाचवता आले नाही. कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल कोरोना रूग्णांना भेटण्याची परवानगी नसते, परंतु काननने नर्सद्वारे पती जयेश पटेल यांच्या ओठांवर पवित्र पाणी ठेवले आणि नवऱ्याच्या पलंगाजवळ ठेवण्यासाठी गणेश मूर्ती देखील दिली.

कानन पटेल यांनी आपल्या पतीच्या शेवटच्या दिवसांविषयीची माहिती एका वेबसाईटवर शेअर केली आहे. त्यांचे पती कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पतीचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांना ते दिसू शकले नाहीत याची खंत कानन यांना आहे. कानन म्हणाल्या की, बरेच दिवस घरात आजारी पडल्यानंतर त्यांच्या पतीची प्रकृती अधिकच वाईट झाली होती. त्यांची हाडे दिसू लागली होती. त्यांना ग्लासने पाणी देखील प्यायले जात नव्हते त्यांना चमच्याने पाणी दिले जात होते. कानन म्हणतात की लोकांना औषधे देतानाच त्यांना संसर्ग झाला असावा.

काननच्या पतीने शेवटच्या क्षणी फोनवर बोलताना प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यानंतर, डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले, परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. यानंतर पत्नीने रुग्णालयाच्या कार पार्किंगमध्ये नर्सला भेटून जयेशच्या ओठांवर ठेवण्यासाठी पवित्र पाणी दिले. दुसर्‍या दिवशी त्याच नर्सने काननला फोन करून जयेशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. काननच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ओठांवर पाणी ठेवले असेही नर्सने सांगितले. कानन म्हणाल्या- ‘अशा प्रकारे मी त्याला निरोप दिला.’