पैठणकर यांची पुनर्नियुक्ती चुकीची ; ‘पोलीसनामा’ने उपस्थित केलेला मुद्दा नगरसेवकांनी मांडला महासभेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेचे निलंबीत केलेले घनकचरा विभागप्रमुख डॉ. नानासाहेब पैठणकर यांची चौकशी चालू असताना आयुक्तांनी त्यांना पुन्हा कामावर हजर करुन घेत त्याच विभागात नियुक्ती देण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक शाम नळकांडे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना महासभेतच दिले. या नियुक्तीला ‘पोलीसनामा’ने सर्वप्रथम हरकत घेतली होती. तो मुद्दा नगरसेवकांनी आता लावून धरला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता, कचरा संकलन व वाहतूक, मेलेल्या जनावरांची वाहतूक व विल्हेवाट व अन्य कामे केली जातात. परंतु विभागप्रमुख डॉ. पैठणकर यांनी कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्यानेच जिल्हाधिकारी तथा पत्कालीन प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी निलंबनाची कारवाई केलेली होती. मात्र आयुक्तांनी अवघ्या १ ते दीड महिन्यात त्यांना पुन्हा कामावर घेत त्याच पदावर नियुक्ती दिली. ही बाब बेकायदेशीर आहे. डॉ. पैठणकर यांनी या विभागात अनेक घोटाळे केलेले आहेत. त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती देवून पुरावे नष्ट करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पैठणकर यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई करुन या विभागासाठी प्रकल्प अभियंता किंवा पर्यावरण अभियंता यांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेवक नळकांडे यांनी केली आहे.

डॉ. पैठणकर यांना घनकचरा विभागात पुन्हा त्याच ठिकाणी चौकशी चालू असताना दिलेली नियुक्ती संशयास्पद असल्याबाबत ‘पोलीसनामा’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नगरसेवक विद्या खैरे व नगरसेवक श्‍याम नळकांडे यांनी पैठणकर यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like