देशातील पहिली वहिली ‘बुटक्या’ व्यक्तीवरील बेरिएट्रिक सर्जरी पुण्यात यशस्वी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्रेरणा परब – खोत) लठ्ठपणा ही आजकालची सर्वात मोठी समस्याच बनली आहे. या समेस्येबरोबर लठ्ठपणा हा अनेक रोगांना आमंत्रण देखील देतो. वजन कमी करण्याकरिता योगा, जिम, डाएट अशा अनेक गोष्टी करण्यात येतात. मात्र तरी देखील लठ्ठपणाची समस्या ही समस्यांच राहते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची योग्य सांगाड घालून लठ्ठपणावर बेरि अॅट्रिक सर्जरी वरदान ठरत आहे. या सर्जरीमुळे लठ्ठपणाच्या समस्येबरोबरच त्यासोबत येणाऱ्या समस्या आणि आजार देखील आटोक्यात येतात. विशेष म्हणजे पुण्यातील नोबल हॉस्पिटल मध्ये कमी उंचीच्या व्यक्तिवर  बेरिअॅट्रिक सर्जरी करण्यात आली आहे. देशातील कमी उंचीच्या व्यक्तीवर अशा प्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

दिगंबर मुते असे या ३४ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ही सर्जरी यशस्वी करण्यामागे बेरिएट्रिककल आणि मेटाबोलिक सर्जन डॉ . केदार पाटील यांनी ही यशस्वी  शस्त्रक्रिया केली आहे. ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली ते दिगंबर मुते मुळचे  श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची उंची १२० सेंमी  असून त्यांचे वजन ७० किलो पेक्षा जास्त होते. खरेतर कोणत्याही व्यक्तीची उंची आणि त्याचे वजन यांचा ताळमेळ असणे खूप महत्वाचे असते पण दिगंबर यांच्या बाबतीत असे नव्हते. त्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच जास्त होते. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘सुपर ओबेसिटी’ असे म्हणतात. त्यांच्या अतिवजनामुळे घोरण्याचा तसेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. दिगंबर यांचा बी एम आय (body mass index) ५० पेक्षा जास्त होता. ज्या व्यक्तींमध्ये बी एम आय ३२.५ असतो ते रुग्ण ही शस्त्रक्रिया करण्यास पात्र असतात. यापूर्वी ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांची कमीत कमी उंची १३५ सेंमी होती अशी माहिती डॉ . पाटील यांनी दिली आहे.

घोरणे म्हणजे सुखाची झोप नव्हेच ते स्थूलतेचे लक्षण

खरतर घोरणे म्हणजे सुखाची झोप अशी मान्यता सर्वत्र आहे पण डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लठ्ठ व्यक्तीमध्ये घोरण्याचा प्रकार होतो. यावेळी अति वजनामुळे जीभ जड होते आणि मानेत फॅट डिपाॅझिशन होते. त्यामुळे शवसनाच्या प्रक्रियेतील प्रमुख भाग म्हणजे ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑकसाईड बाहेर सोडण्याला अडथळा निर्मण होते. कार्बन डायॉक्साईड शरीरातील रक्तात जास्त राहिल्यामुळे उजव्या हृदयावर ताण येतो. कधीकधी अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू येण्याची देखील संभावना असते.

काय होते या शस्त्रक्रियेत आव्हान 

डॉ केदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या सामान्य व्यक्तीवर करण्यात येणारी बेरिएट्रिक सर्जरी आणि कमी उंचीच्या व्यक्तीवर करण्यात येणारी बेरिएट्रिक सर्जरी यात खूप फरक आहे. ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आली  आहे. इतर पेशन्ट मध्ये पोटात जागा जास्त असते मात्र दिगंबर यांच्या बाबतीत मोठी तांत्रिक समस्या होती कारण चरबीचे प्रमाण जास्त होते आणि पोटाचा आकार कमी होता. तसेच भूल देण्याचे देखील  मोठे आव्हान होते . कारण लठ्ठ  व्यक्तीमध्ये भूल देण्यामध्ये मोठी समस्या होते त्यात दिगंबर यांची उंची कमी असल्यामुळे भूल देणे  हे देखील आव्हान होते. त्यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान व्हेंटिलेटर ची व्यवस्था देखील करण्यात आली होती. तसेच या शस्त्रक्रियेपूर्वी अनेकदा याचे काय परिणाम होतील आणि कशा प्रकारे ही शस्त्रक्रिया करायची यावर बैठका आणि अभ्यास करण्यात आला होता.शस्त्रक्रियेपूर्वी त्यांचे वजन ७२ किलो होते तर शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी  त्यांचे वजन ६६ किलो नोंदवण्यात आले.

या शस्त्रक्रियेदरम्यान नक्की काय केले जाते

लठ्ठपणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या चयापचय क्रियेला बेरिएट्रिक सर्जरीच्या माध्यमातून नेहमीच्या पातळीवर आणू शकतो. हा शास्त्रीय उपचार असून त्याद्वारे लठ्ठपणा आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करणं शक्य होतं. ही शस्त्रक्रिया दुर्बीणीद्वारे केली जाते . या शस्त्रक्रियेमध्ये जठर आणि लहान आतडं यांच्या रचनेत काही विशिष्ट बदल करून चालना देण्यात येते. त्यामुळे रुग्नाला जास्त खाता येत नाही आणि कमी खाल्ले तरी भूक लागत नाही. याद्वारे लठ्ठपणामुळे येणारा प्री-डायबेटिस, डायबेटिस आणि सेक्शुअल ऑर्गन डिस्फंक्शन संपूर्णतः टाळता येतो. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्यानुसार काही दिवस योग्य आहार आणि औषधे घेणे महत्वाचे असते. तसेच शस्त्रक्रियापूर्वी देखील योग्य आहार घेणे गरजेचे असते.

ही सर्जरी यशस्वी करण्यामागे बेरिएट्रिकल आणि मेटाबोलिक सर्जन डॉ . केदार पाटील यांची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर डॉक्टर उमेश पापुर्निया (लॅप्रोस्कॉपीक सर्जन ), डॉ रीमा काशिवा (फिजिशियन), डॉ अडकर, भूलतज्ञ डॉ साले आणि डॉ पल्लवी  डॉ .रेणुका  नोबल हॉस्पिटलचा स्टाफ यांचे सहाय्य लाभले.