दुर्देवी ! दाम्पत्याला झोपेतच रॉकेल ओतून जाळले, दोघांचा मृत्यू

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  एका दाम्पत्याला झोपेत असतानाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कोकटनूर (ता. अथणी) येथे उघडकीस आली आहे. तीन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पती आणि पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाऊबंदकी व कौटुंबीक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेने अथणी तालुक्‍यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेखा महादेव मादर (वय 45) व तिचा पती महादेव सीताराम मादर (वय 50 दोघेही रा. कोकटनूर, ता. अथणी) अशी मृत्यू झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. ऐगळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा मादर व महादेव मादर हे दांपत्य गुरूवारी (दि. 11) मध्यरात्री झोपेत असताना त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटविले. यात दोघेही गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचारासाठी हुबळीतील रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 12) पत्नी रेखा मादर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेव याच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी (दि.14) त्याचाही मृत्यू झाला. मयत मादर दांपत्याच्या मागे दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.