Pune News : इंदापूरजवळ झालेल्या ट्रक-कारच्या भीषण अपघातात पुण्यातील दांपत्य जागीच ठार

इंदापूर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुण्यातील दांमपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना इंदापूर-अकलूज राज्य मार्गावरील विठ्ठलवा़डी येथील वळणावर घडली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. ही अपघात आज (रविवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

कार चालक पांडुरंग सिताराम ताथवडे (वय-58) आणि रुग्मिणी पांडुरंग ताथवडे (वय-50 दोघे रा. खडकी, मूळ रा. केंदूर पाबळ, ता. शिरूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ट्रक (एमएच 12 एमव्ही 7434) हा भरधाव वेगात बावडा बाजूने इंदापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या नेक्सॉन कारला (एमएच 12 आरएफ 2662) ट्रकची जोरदार धडक बसली. समोरासमोर झालेल्या या अपघातात कार चालक आणि त्याची पत्नी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यामुळे कारचे इंजिन बाहेर पडले. अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामाकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. इंदापूर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव करीत आहेत.