Covid-19 : घरीच रेमडेसिवीरचा वापर करु नये, आरोग्य मंत्रालयाकडून ‘होम आयसोलेशन’साठी नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाची हलकी लक्षणे जाणवत असतील तर अशा रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. ‘होम आयसोलेसन’साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. सुधारीत गाईडलाईन्समध्ये ‘होम आयसोलेसन’मध्ये राहणाऱ्यांना हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा किंवा टोचून घेण्याचा प्रयत्न करु नये, असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. केवळ रुग्णालयातच रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाईल, असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून नवीन गाईडलाईन्स जारी

– नव्या गाईडलाईन्सनुसार 60 वर्षाहून अधिक वयाच्या रुग्णांनी किंवा हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयरोग फुफ्फुसाचा आजार असणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘होम आयसोलेसन’मध्ये रहावे.

– हलकी लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना ‘स्टेरॉईड’ दिले जाऊ नये. तसेच सात दिवसानंतरही लक्षणं राहिली (ताप, सर्दी, खोकला इ.) तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कमी तीव्रतेची ‘ओरल स्टेरॉईड’ वापरता येऊ शकतील.

– ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी कमी झाल्यास किंवा श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यास रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन डॉक्टरांकडून त्वरीत सल्ला घ्यावा.

– रुग्णांना किंवा हलकी लक्षणं जाणवणाऱ्या नागरिकांना गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा किंवा दोन वेळा गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

– 650 एमजी पॅरासीटेमॉल दिवसातून चार वेळा घेतल्यानंतर देखील ताप नियंत्रणात येत नसेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– रेमडेसिवीरचा वापर किंवा इतर कोणतीही चाचणी थेरेपी डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि रुग्णालयातच व्हायला हवी. घरीच राहून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा आणि वापर करण्याचा प्रयत्न करु नये, यावर आरोग्य मंत्रालयाकडून जोर देण्यात आला आहे.

– डॉक्टरांना उपचाराचा सल्ला देताना, डॉक्टरांकडून दिवसातून दोन वेळा 250 एमजी नॅप्रोक्सेन सारख्या इतर औषधांचा सल्ला दिला जाऊ शकतो. आयवरमॅक्टीन (रिकाम्या पोटी प्रतिदिन 200 एमजी प्रती किलोग्रॅम) तीन ते पाच दिवस देण्यासंबंधी डॉक्टर विचार करु शकतात. तसेच पाच दिवसानंतरही लक्षणं कायम राहिल्यास ‘इनहेलेशन बनसोनाइड’ दिलं जाऊ शकतं, असेही सांगण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारची लक्षणं न जाणवणाऱ्या रुग्णांची प्रयोगशाळेत पुष्टी व्हायला हवी. यात व्यक्तींना कोणत्याही पद्धतीचे लक्षणं जाणवू नयेत तसेच त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 94 टक्क्यांहून अधिक व्हायला हवं. हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना श्वासोच्छवासात कोणताही अडथळा जणवू नये तसेच त्याची ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा अधिक असायला हवी. ‘होम आयसोलेसन’साठी अशा प्रकारे सुधारीत दिशा निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.