चिंताजनक : लस घेऊनही 2 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे वाटत असतानाच कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना प्रतिबंधक लसची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असतानाच लस घेतल्यानंतरही पुण्यातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे लस देऊनही जर कोरोनाची लागण होत असेल तर बाधितांची संख्या वाढू शकते यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलने कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी १८ फेब्रुवारीला केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यापासून ते अधिकारीपर्यत सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. सध्या या दोन्ही कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे, अमरावतीमध्ये लस टोचल्यानंतरही कोरोना
पुणे नाशिक, अमरावती येथेही कोरोना लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, घाबरून जायचे काही एक कारण नाही, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना केवळ पहिला डोस देण्यात आला आहे. जर कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

ससून रुग्णालयातील एका नर्सला लस टोचल्यानंतरही कोरोना झाला आहे. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना ससूनचे डीन मुरलीधर तांबे म्हणाले, लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे खरे आहे. पण घाबरून जाण्याचे कारण नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं त्यांनी सांगितलं. नाशिकच्या नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला होता. दरम्यान तो एका कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाली. तर तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील १२ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस देऊनही कोरोनाची कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. तसेच कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे,असल्याचं निकम यांनी सांगितलं.

कोरोनातून बरे झाल्यावरही कोरोना
राज्यातील काही नेते तसेच डॉक्टरांना उपचार घेतल्यानंतरही पुन्हा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह नागपूरमधील पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.

चेंबूरमध्ये चार इमारती सील
गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या ठिकाणच्या चार इमारती १४ दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे. शुक्रवारी मुंबईत ८२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.