‘कोरोना’ चाचणी परीक्षा कठीणच ! काही केंद्रांवर गर्दी, तर कुठे केंद्र बदलले

पोलीसनामा ऑनलाइन – शाळा सुरु करण्याच्या धर्तीवर शिक्षकांच्या कोविड तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचण्यांना शहरात सुरुवात झाली आहे. मात्र, ही चाचणी करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या त्रासाला सामोरे जात असल्याची तक्रार समोर आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षण विभागाने नेमून दिलेल्या केंद्रांवर पोचल्यावर शासकीय रुग्णालयातून चाचणी केली. त्यानंतर तो रिपोर्ट सादर करण्याचा मेसेज शिक्षकांना मिळाला. काही ठिकाणी मुंबईत राहणाऱ्या व ठाण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी चाचणी कोणत्या केंद्रावर करावी याबाबत स्पष्ट सांगितलं नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी चे वर्ग सुरू होत आहेत. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, शाळेजवळ केंद्र नसणे, केंद्र बाबत स्पष्टता नाही, एका महापालिका हद्दीतील चाचणी अहवाल दुसऱ्या महापालिका हद्दीतील कामाच्या ठिकाणी चालणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गुरुवारी शिक्षकांचा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला.

चारकोपमधील शासकीय रुग्णालय, जोगेश्वरी येथील अरविंद गंडभीर हायस्कूल, दहिसर, मुलुंड येथील मिठागर येथे शिक्षकांच्या चाचण्या गुरुवारी सकाळपासून सुरू झाल्या. काही ठिकाणी त्या चार वाजताच बंद करण्यात आल्यानं त्यांना दुसर्‍या दिवशी पायपीट करावी लागणार असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गर्दी आमंत्रित करते संसर्गाची भीती

अनेक शिक्षक मूळ गावी सुट्टीसाठी गेल्याने शिक्षण विभागाने शाळांना पंधरा दिवसांचा वेळ द्यावा आणि नंतरची शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. चाचणी केंद्रावरील गर्दीमुळे संसर्गाची भीती असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिली. सर्व शिक्षकांच्या चाचण्या दोन ते तीन दिवसात होणे अशक्य आहे. शिक्षकांनी कोठेही केलेल्या चाचण्या कोणत्याही हद्दीत ग्राह्य धरावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केले.