Covid-19 : ‘कोरोना’ लसीकरणासाठी निवडणुकीसारखी तयारी ! 20 मंत्रालये आणि 23 विभाग बजावतील महत्वाची भूमिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात गेल्या वर्षी 27 जानेवारी रोजी कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण आढळले होते. त्यानंतर आतापर्यंत देशातील एक कोटीहून अधिक लोक या धोकादायक विषाणूच्या कचाट्यात आले आहेत. या दरम्यान एक चांगली बातमी आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारने मान्यता दिली आहे. लसीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, देशातील 130 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करणे सोपे आव्हान ठरणार नाही. यासाठी मोदी सरकारने युद्धपातळीवरची तयारी पूर्ण केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, लसीकरणासाठी निवडणुकांप्रमाणेच बूथ स्तरावर तयारी सुरू आहे. सरकारने यासाठी 20 मंत्रालये आणि 23 विभाग तैनात केले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड – 19 साठी नॅशनल ग्रुप ऑन वॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NEGVA) च्या मार्गदर्शक सूचनानुसार ही लस दिली जाईल. यासाठी केंद्र सरकारच्या सुमारे 20 मंत्रालयांना काम देण्यात आले आहे. लसीकरणासंदर्भात राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त, केंद्राच्या प्रत्येक मंत्र्यांना देखील सांगितले गेले कि, लसीकरणाच्या वेळी त्यांची भूमिका काय असेल. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक प्रक्रियेनुसार प्रत्येक बूथ स्तरावर लसीकरणाचे काम केले जाईल. यासाठी देशातील 719 जिल्ह्यात 57 हजार लोकांनी प्रशिक्षणात भाग घेतला. तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की, आतापर्यंत लसीकरण झालेल्या 96 हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रत्येक विभागाची वेगवेगळी जबाबदारी

माहितीनुसार, सरकारने शहरी विकास, महसूल, पीडब्ल्यूडी आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी या किमान चार विभागांना जबाबदारी दिली आहे कि, त्यांनी अश्या जागा पाहाव्यात ज्यांना लसीकरणाचे केंद्र बनविता येईल. भारतात सुमारे 82 लाख लसीकरण केंद्रे बांधली जाऊ शकतात, परंतु कोरोनामुळे सामाजिक अंतर राखण्यासाठी बर्‍याच विशेष गोष्टींची आवश्यकता असू शकते. अशा परिस्थितीत लसीकरण केंद्रांची संख्या कमी होऊ शकते. युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रम (यूआयपी) अंतर्गत येणारी केंद्रे वापरली जाऊ शकतात.

दरम्यान, यूआईपी अंतर्गत 28900 कोल्ड चेन आणि सुमारे 8500 उपकरणे वापरली जातील. 1978 मध्ये भारतात लसीकरण सुरू झाले आणि 1985 मध्ये या मोहिमेला युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रम असे नाव देण्यात आले. याअंतर्गत, 12 आजारांसाठी आणि गर्भवती महिला आणि मुलांसाठी लसीकरण केले जाते.