कोविशील्डने होत नाही ब्लड क्लॉटिंग; काळजी करू नका, सरकारने केले शंकेचे निरसन

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड ऍस्ट्रोजेनका वॅक्सीनविषयी युरोपियन देशांकडून येणारे संबंधित अहवाल सरकारने फेटाळले आहेत. सरकारने म्हंटले आहे की ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि काळजीशिवाय वापरली जाऊ शकते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी म्हंटले आहे की लसीकरनंतरची स्थिती पाहिल्यानंतर असे दिसून आले की या लसीमधून रक्त गोठण्याचा धोका नाही. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सफोर्ड ही लस बनवली आहे आणि येथे या लसीचे नाव कोविशील्ड ठेवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे डेन्मार्क, नॉर्वे आणि आइसलँड या युरोपियन देशांनी ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेनेका वॅक्सीनने लसीकरण करण्यावर तात्काळ बंदी घातली होती. त्यानंतर युरोपियन युनियनचे एक्सपर्ट्स म्हणाले की ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेनेका वॅक्सीनने ब्लड क्लॉटिंग सारख्या गंभीर समस्यांची कोणतीही चिन्हे नाही आहेत. तज्ञांचा ग्रीन सिग्नल लसीसाठी मोठा दिलासा मानला जातो. आता ज्या देशांमध्ये ती थांबविण्यात आली होती तेथे या लसीद्वारे लसीकरण सुरु केले जाऊ शकते.

भारतानेही ठेवले लसीच्या दुष्परिणामांवर लक्ष
त्यानंतर अशी वार्ता आली होती की चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारत देखील या लसीचा आढावा घेईल. भारताच्या नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य एन.के अरोडा म्हणाले, आम्ही विपरीत घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. विशेषतः लसीकरणानंतर मृत्यू आणि रुग्णालयात दाखल करण्यासारख्या घटनांवर. जर कोणतीही गंभीर गोष्ट दिसून आली तर आम्ही याबाबत आवश्यक सूचना करू. सध्या काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही कारण देशात गंभीर दुष्परिणामांचे कमी प्रकरणे आहेत. आता आम्ही रक्त गोठण्याच्या समस्येवर लक्ष ठेऊन आहोत.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनीही कोविशील्डची चिंता करू नका असे आवाहन केले आहे. लसीकरणातून कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पॉल म्हणाले-लसीकरणानंतर गंभीर परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय समितीने कोविशील्डमुळे ब्लड क्लॉटिंगला नकार दिला आहे. गेल्या काही दिवसात ही कमिटी अशा प्रकरणांवर लक्ष ठेऊन आहे. मी तुम्हाला खात्री देतो की अशी कोणतीही चिन्हे नाहीत.