खुल्या प्रवर्गातील ‘अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकां’साठी राज्यात ‘या’ नवीन संस्थेची निर्मिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी एका नवीन संस्थेस मान्यता देण्यात आली. ही संस्था ‘अमृत’ या नावाने ओळखली जाणार असून तिच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल. यामुळे खुल्या प्रवर्गातील युवकांचा विकास योजनाबद्ध रीतीने होण्यास हातभार लागेल.

अशा पद्धतीने कार्य करणार ‘अमृत’ :
अमृत संस्थेकडून अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना व्यवसाय, नोकरी, रोजगार, उद्योग, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण इत्यादी साठी मदत दिली जाईल. त्याचबरोबर कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याबरोबरच गरजेनुसार संबंधितांना समुपदेशन आणि मार्गदर्शनाचीही व्यवस्था केली जाणार आहे. संस्थेची स्थापना व कार्यान्वयानासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार या विभागाच्या मंत्र्यांना सरकारकडून दिलेले आहेत.

सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थांच्या धर्तीवर ‘अमृत’ची स्थापना :
राज्य सरकारकडून याआधी अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने १९७८ साली ‘बार्टी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ म्हणजेच ‘महाज्योती’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. तर अलीकडेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सारथी ही संस्था देखील महाराष्ट्र शासनाने स्थापन केली आहे. त्याच धर्तीवर आता ‘अमृत’ची स्थापना झाली असून केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या राज्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो.

आरोग्यविषयक वृत्त