भारताच्या अंडर १९ संघाचं नेतृत्व २१ चेंडूत शतक झळकावणाऱ्या ‘या’ युवा खेळाडूकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘यूथ एशिया कप’मध्ये सहभागी होण्यासाठी भारताने तयारी सुरु केली असून बीसीसीआयने अंडर १९ संघाची घोषणा केली आहे. या युवा खेळाडूंच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी संघ व्यवस्थापनाने ध्रुव चंद जुरेल यांच्याकडे सोपवली आहे. ही स्पर्धा ३ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

नोएडाचा असणारा ध्रुव यष्टीरक्षक फलंदाज असून सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेमध्ये देखील चमकदार कामगिरी करत आहे. ही तिरंगी मालिका भारत, इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सुरु आहे. ध्रुवची नुकतीच चार महिन्यांपूर्वीच अंडर १९ संघात निवड झाल्यानंतर तो दोन केवळ मालिका खेळला आहे. सध्याचा कर्णधार प्रियम गर्ग या मालिकेत खेळणार नसल्यानं आता कर्णधारपदाची धुरा ध्रुव सांभाळणार आहे.

अशी आहे ध्रुव ची चमकदार कामगिरी :

ध्रुवने मागील वर्षी उत्तर प्रदेशकडून कूच विहार ट्रॉफीत ११ सामन्यांमध्ये खेळला होता. यामध्ये त्याने एकूण तीन शतकांसह ७६२ धावा केल्या होत्या. याचबरोबर उत्तम यष्टिरक्षण करत त्याने ५१ खेळाडूंना यष्टीचीत केले होते. २०१७ मध्ये मध्य प्रदेश आणि आग्रा यांच्यात झालेल्या टी २० सामन्यांच्या स्पर्धेत त्याने मालिकावीरचा पुरस्कारही पटकावला होता. यामधील एका सामन्यात त्याने २१ चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची कामगिरी केली होती.

२०१४ साली झालेल्या अंडर १७ स्कूल नॅशनल क्रिकेट टी २० चॅम्पियनशिपमध्ये त्याने ६ सामन्यात ६ शतकं आणि २ अर्धशतकं अशी खेळी केली होती. यामध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळाला होता.

आरोग्यविषयक वृत्त