वाढदिवसाच्या दिवशी युवराज सिंहने व्यक्त केले दु:ख – ‘वडिलांच्या ’हिंदू’ संबंधी वक्तव्याने दुखावलो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाला दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा क्रिकेटर युवराज सिंहचा आज वाढदिवस आहे. परंतु, असे वाटत आहे की, यावेळी हा चॅम्पियन खेळाडू आपल्या वाढदिवशी खुश नाही. त्याने वक्तव्य जारी करून म्हटले आहे की तो आपले वडिल योगराज सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खुप दुखावला आहे. सोबतच युवराजने हे सुद्धा म्हटले आहे की, त्याचे विचार वडिलांपेक्षा वेगळे आहेत. युवराजने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त केली आहे की, मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपेल आणि सरकार यावर तोडगा काढेल.

वडिलांच्या वक्तव्याने दुखावला
12 डिसेंबर 1981 ला जन्मलेला युवराज सिंह आज 39 वर्षांचा झाला आहे. रात्री ठिक 12 वाजता युवराज सिंहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिले, ’एक भारतीय असल्याने मी माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्याने खुप दु:खी आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, हे त्यांचे स्वत:चे वक्तव्य आहे. माझे विचार तसे नाहीत.’

काय म्हटले होते योगराज सिंह यांनी ?
सुमारे एक आठवड्यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी गेलेले माजी क्रिकेटर युवराज सिंहचे वडिल योगराज सिंह यांनी कथित प्रकारे हिंदूंबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पंजाबीमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी हिंदूंसाठी गद्दार शब्दचा वापर केला होता. त्यांनी म्हटले होते की, हे हिंदू गद्दार आहेत, शंभर वर्ष मुघलांची गुलामी केली. इतकेच नव्हे, त्यांनी महिलांसाठी सुद्धा वादग्रस्त विधान केले होते. योगराज सिंह यांचे हे भाषण सोशल मीडियावर वायरल झाले आणि लोक त्यांच्या अटकेची मागणी करू लागले.

युवराजची मागणी, शेतकरी आंदोलन संपावे
युवराज सिंहने आपल्या वक्तव्याची सुरूवात शेतकरी आंदोलनवरून केली आहे. त्याने लिहिले आहे की, ’लोक वाढदिवसाला आपली इच्छा पूर्ण करतात. परंतु मी यावेळी वाढदिवस साजरा करण्याऐवजी अपेक्षा करतो की, सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेनंतर हे आंदोलन समाप्त होईल. शेतकरी आपल्या देशाचे जीवन चालवतात. मला पूर्ण विश्वास आहे की, अशी कोणतीही समस्या नाही, जी शांततेच्या मार्गाने सोडवता येत नाही.