ICC नं ‘या’ देशाला केलं निलंबीत, ६ महिन्यानंतर टीम इंडियासोबत होती मालिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपनंतर अंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे झिम्बाब्वे कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकणार नाही. लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयसीसीने या निर्णयाची घोषणा केली.

झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे याआधी देखील आयसीसीने यासंदर्भात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला इशारा दिला होता. मात्र त्यानंतर देखील सरकारी हस्तक्षेप कमी न झाल्याने आयसीसीने अखेर हा निर्णय घेतला. आयसीसीने हा निर्णय तिथल्या सरकारने क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर घेतला आहे.

ज्यावेळी आयसीसीने हा निर्णय घेतला त्यावेळी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु होती. झिम्बाब्वे बरोबरच आयसीसीने क्रोएशिया क्रिकेट फेडरेशनला देखील निलंबित केले आहे.

आयसीसीचे चेअरमन शंशाक मनोहर यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, कोणत्याही सदस्याला निलंबित करण्याचा निर्णय आम्ही असाच घेत नाही. मात्र, खेळात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. झिम्बाब्वेत जे काही झालं ते आयसीसीच्या नियमाला धरून नव्हतं. त्यामुळे आम्ही या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे यापुढे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत. त्याचबरोबर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.

दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात झिम्बाब्वे ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार होती. मात्र आता या निर्णयामुळे या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून झिम्बाब्वे खराब परिस्थितून जात असून क्रिकेटमध्ये देखील खराब खेळ करत आहेत.