भारताविरुद्धच्या सामन्यानंतर न्यूझीलंडचा ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू होणार निवृत्त

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच न्यूझीलंड क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडले वॉटलिंगने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंडसाठी वॉटलिंगचा हा शेवटचा सामना असणार आहे. न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक म्हणून वॉटलिंग आपल्या कारकीर्दीची सांगता करेल.

वॉटलिंगचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबनमध्ये झाला. मात्र तो 10 वर्षांचा असतानाच त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. वॉटलिंगने 2009 साली न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 249 झेल पकडल्या आहेत. न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला आणि एकमेव विकेटकिपर-बॅट्समन आहे. त्याने 73 टेस्टमध्ये 38.11 च्या सरासरीने 3773 धाव केल्या आहेत. यात 8 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वॉटलिंगने न्यूझीलंडकडून 5 टी 20 आणि 28 वन-डे मॅच देखील खेळल्या आहेत. वॉटलिंग न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनचा सर्वात विश्वासू खेळाडू आहे. यापूर्वी एकदा विल्यमसनला तुझा जीव वाचवण्यासाठी कोणत्या खेळाडूची निवड करशील ? हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने वॉटलिंगचे नाव घेतले होते. 2008 साली हॅमिल्टवमधील एका क्लबकडून 378 रनची विशाल खेळी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधले होते.