भारत सोडून दक्षिण अफ्रीकेत गेला, पीटरसनला पडावे लागले टीमच्या बाहेर, धावांचा डोंगर रचला आणि नंतर 5 वर्षांचा कारावास

नवी दिल्ली : एक क्रिकेटर जेव्हा लहान होता तेव्हा भारतातून दक्षिण अफ्रीकेत गेला. तिथे जाऊन त्याने स्वताला क्रिकेटमध्ये झोकून दिले. अगोदर स्कूल लेव्हल आणि नंतर अंडर 19 लेव्हलवर नेत्रदिपक यश मिळवले आणि दक्षिण अफ्रीकेसाठी वर्ल्ड कप खेळला. नंतर स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावले. यादरम्यान त्याच्यासाठी केविन पीटरसनला टीमच्या बाहेर काढण्यात आले. पुढे जाऊन पीटरसनने दक्षिण अफ्रीका सोडली आणि इंग्लंडला खेळायला गेला. तर या खेळाडूला जबरदस्त खेळामुळे सीनियर टीममध्ये संधी मिळाली. परंतु, बोटाला दुखापत झाली आणि आठ-नऊ वर्षासाठी तो पडद्याआड गेला. परंतु, पुन्हा त्याचा खेळ चमकला आणि तो सुद्धा. नंतर वनडे आणि टी20 दोन्ही मध्ये दक्षिण अफ्रीकेसाठी डेब्यू केला. परंतु पुढे जाऊन मॅच फिक्सिंगचा डाग लागला आणि कारागृहात जावे लागले. या क्रिकेटरचे नाव आहे गुलाम बोदी (Gulam Bodi). आजच्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी 1979 ला त्याचा जन्म झाला आहे.

बोदीचा जन्म दिल्ली-मुंबई हायवेवर सूरतपासून 42 किलोमीटर वरील हाथूरण नावाच्या गावात झाला. तो शिक्षणासाठी दक्षिण अफ्रीकेत गेला आणि नंतर तिथेच स्थायीक झाला. डाव्या हाताचा फलंदाज आणि पार्टटाइम चायनामॅन गोलंदाज म्हणून त्याने क्रिकेटमध्ये नाव कमावले. आपल्या दमदार खेळाच्या बळावर बोदीने दक्षिण अफ्रीकेच्या क्रिकेटच्या वेगवेगळ्या लेव्हलवर स्वताचे स्थान निर्माण केले. 1999 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा तो दक्षिण अफ्रीकेसाठी खेळला. या दरम्यान चांगल्या खेळाच्या बळावर त्याला वेस्ट इंडीज दौर्‍यावर बोलावण्यात आले. तो नॅशनल सीनियर टीममध्ये एंट्री करण्याच्या जवळ पोहचला होता. परंतु, तेव्हा बोट तुटल्याने ही संधी हुकली. यानंतर मोठ्या काळासाठी तो पडद्याआड होता.

जेव्हा पीटरसनला टीम बाहेर काढले
यादरम्यान तो स्थानिक क्रिकेटमध्ये क्वाजुलु नटाल टीममध्ये होता. केविन पीटरसन सुद्धा यामध्येच खेळत होता. 1999-2000 मध्ये बोदीने 332 धावा केल्या आणि 27 विकेट घेतल्या. त्याच्या या खेळामुळे पीटरसनची टीममधून सुट्टी झाली. कारण तो चार मॅचमध्ये 50 च्या आसपास धावा करू शकला होता. नंतर पीटरसनने निवड समितीवर टिका करत दक्षिण अफ्रीका सोडले होते. पीटरसन इंग्लंडला गेला आणि तिथे यशस्वी क्रिकेटर बनला.

दोन वनडेमध्ये एक फिफ्टी तरीसुद्धा टीममधून बाहेर
2007 मध्ये प्रो20 टूर्नामेंटमधून पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला. येथून त्याच्या करियरला नवीन सुरूवात झाली. टायटंस टीमसाठी खेळताना टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवडला गेला आणि खेळण्याची संधी मिळाली. काही दिवसानंतर ऑगस्ट 2007 मध्ये झिम्बाब्वेच्य विरूद्ध वनडे डेब्यू केला आणि फिफ्टी लगावल्या. यानंतर 32 धावांची आकर्षक खेळी केली परंतु पुन्हा टीममधून असा बाहेर गेला की पुन्हा परतू शकला नाही. 2007च्या अखेरीस वेस्ट इंडीजच्या विरूद्ध एका टी20 सामन्यात सुद्धा खेळला परंतु आठ धावा बनवू शकला. पुन्हा या फॉर्मेटमध्ये संधी मिळाली नाही.

आयपीएलमध्ये दिल्लीशी जोडला गेला पण खेळला नाही
बोदीने नंतर स्थानिक क्रिकेट टीममध्ये स्थान निर्माण केले. येथे त्याने टायटन्स आणि लॉयन्ससाठी खुप धावा बनवल्या. 2012 मध्ये लॉयन्सला चॅम्पियन्स लीग फायनलपर्यंत जाण्यात महत्वाची भूमिका निभावली. त्याने सहा डावात तीन फिफ्टीच्या बळावर 208 धावा बनवल्या. या खेळामुळे आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्ससाठी निवड झाली. परंतु, खेळण्याची संधी मिळाली नाही. गुलाम बोदीने फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी20 मध्ये मिळून एकुण 10 हजारपेक्षा जास्त धावा केल्या.

फिक्सिंगच्या आरोपात 5 वर्ष जेल
जानेवारी 2016 मध्ये क्रिकेट साउथ अफ्रीकेने मॅच फिक्सिंगच्या अरोपात बोदीला पकडले. असे म्हटले गेले की, त्याने रॅम स्लॅम टी20 चॅलेंजमध्ये गडबड केली. नंतर क्रिकेट साउथ अफ्रीकाने म्हटले की, बोदी मॅच फिक्सिंग स्कँडलचा केंद्र होता. त्याला 20 वर्षांसाठी बॅन करण्यात आले. नोव्हेंबर 2018 मध्ये बोदीने गुन्हा कबुल केला. ऑक्टोबर 2019 मध्ये त्याला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.