टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अन् कपिल देव यांना देखील मोठा सन्मान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    विराट कोहली (टीम इंडिया कर्णधार)च्या नावावर आणखी एक विक्रम नोंदविण्यात आला आहे. विस्डेन क्रिकेटर अल्मॅनॅकने कोहलीला गेल्या दशकातील (२०१०) सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून घोषीत केले आहे. या काळात विराटने ६० च्या सरासरीने ११ हजाराहून अधिक धावा केल्या. या दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात विक्रमी ४२ शतकेही ठोकली. ३२ वर्षांच्या कोहलीनं ऑगस्ट २००८ साली श्रीलंकेच्या विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सर्वकालीन सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये त्याचा समावेश होतो.

विराटने आजवर २५४ वन-डेमध्ये १२ हजार ६५९ रन काढले आहेत. पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय मॅचला ५० वर्ष होत असल्याच्या निमित्तानं विस्डेननं प्रत्येक दशकातील पाच वन-डे क्रिकेटपटूंची निवड केली आहे. विराटची २०१० च्या दशकातील कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे. २०११ साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा विराट सदस्य होता. त्यानं १० वर्षात ११ हजार पेक्षा जास्त रन काढले असून यामध्ये ४२ सेंच्युरींचा समावेश आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्यानंतर हा पुरस्कार जिंकणारा कोहली हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. सचिननं १९९८ या एकाच वर्षात ९ वन-डे सेंच्युरी झळकावल्या होत्या. वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांची ८० च्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कॅप्टनीमध्ये भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांनी ८० च्या दशकात सर्वात जास्त विकेट्स घेतल्या तसंच सर्वात जास्त स्ट्राईक रेटनं १ हजार पेक्षा जास्त रन बनवले होते. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटपटू म्हणून तर वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डची सर्वश्रेष्ठ T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सची (Ben Stokes) सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे.