वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्तांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुधाकर शिवाजी पालवे, भाऊसाहेब रघुनाथ पाठक, जनार्दन म्हातारदेव पालवे, आबासाहेब सूर्यभान पाठक, बाबासाहेब बंडू डोंगरे, लक्ष्मण किसन पाठक (सर्व रा. घाटशिरस, ता. पाथर्डी, जि. नगर) यांचा समावेश आहे.

वृद्धेश्वर

याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडित जाधव (वय 62) या शेतकऱ्याने गुरुवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घाटशिरस येथील देवस्थान ट्रस्टचे कामकाज पाहत असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व विश्वस्तांनी भाविकांकडून मिळालेली देणगी व शेतीकडून मिळालेले उत्पादन याचा ट्रस्टच्या नियमावलीनुसार विनियोग केलेला नाही. त्या रकमेचा हिशेब ठेवला नाही. तसेच नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया न राबवता रक्कम परस्पर स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने खर्च केली. यात देवस्थान ट्रस्ट मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडित यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरून सदरचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जावळे हे करीत आहेत.