मुलाचा अपघाती मृत्यू, मात्र आईवर गुन्हा दाखल

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  भऱधाव ट्रकने स्कुटरला धडक दिल्याने 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. पण त्याला लायसन्स नसताना स्कुटर चालवायची परवानगी दिली म्हणून त्याच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. तर ट्रकचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हैदराबाद येथील मस्जिदबांदा येथे ही घटना घडली आहे.

जी. योगेश सागर (वय 19) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई डी. गीता राणी हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर ट्रक ड्रायव्हर डी. भुमैया याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी योगेश स्कुटवर जात असताना काँक्रीट मिक्सर ट्रकने धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. योगेशकडे ड्रायव्हिंग लायसेन्स अर्थात वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. मात्र त्याला कायद्याची जाणीव करून देऊन, लायसेन्स काढल्याशिवाय गाडी चालवू न देण्याची जबाबदारी पालक म्हणून त्याच्या आईची होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर ट्रक ड्रायव्हर डी. भुमैया याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ट्रकचा मालक कमलाकर रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. अवजड वाहन असूनही ड्रायव्हर ते अतिवेगाने, बेजबाबदारपणे चालवत होता असा ठपका ट्रक ड्रायव्हरवर ठेवण्यात आला आहे.