स्त्रीच्या पार्श्वभागाला स्पर्श करणे हा गुन्हाच, मुंबईतील सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एखाद्या महिलेच्या पार्श्वभागाला हात लावणे अथवा स्पर्श करणे हा गुन्हाच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबईतील सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित नांदगावकर यांनी दिला आहे. तसेच एका 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली 22 वर्षीय आरोपीला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीने लैंगिक भावना मनात ठेवूनच तक्रारदार मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचे सिद्ध झाल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार मुलगी 17 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ब्रेड आणण्यासाठी दुकानात जात होती. त्यावेळी चौघांच्या टोळक्याने तिला चिडवण्यास सुरुवात केली़. त्यानंतर ती मुलगी एकदा मैत्रीणीसोबत मंदिरात चालली होती़ . त्यावेळी त्या चौघांपैकी एकाने तिच्या पार्श्वभागाला स्पर्श करून चापट मारली. त्यानंतर या मुलाविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश नांदगावकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वतीने बचावाची भूमिका घेताना तक्रारदार मुलीने तिच्या खासगी भागाला हात लावल्याचा आरोप केला आहे़ मात्र तिच्या पार्श्वभाग हा खासगी भागाच्या कक्षेत मोडत नाही़ गुगलवरही पार्श्वभागाचा खासगी भाग असा अर्थ काढला नाही, असा दावा केला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. आरोपीला दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा ठोठावली.