धक्कादायक ! पुण्यात महिला गुंडाची टोळी सक्रिय; हिनादीदी, आमच्या गँगची लिडर म्हणत घातला ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तू आम्हाला ओळखत नाही का? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे. तिच्या परवानगीशिवाय महादेववाडी परिसरात गाडी आणायची नाही. परत गाडी आणलास तर खल्लास करून टाकीन अशी धमकी देत महिला टोळीने एका व्यक्तीच्या घरी जावून तलावर, कोयत्याने दरवाज्यावर मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महादेववाडी , खडकी येथील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गुरुवारी (दि.21) हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिच्या दोन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

रिना उर्फ हिना तायडे (वय.24,रा. महादेववाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचे इतर दोन साथीदार अनुक्रमे सोन्या गोपनारायण आणि लोहार यांच्यावर आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमित प्रकाश काची (वय.36) यांनी फिर्याद दिली आहे

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित काची हे खडकी परिसरातील एका कापड दुकानात नोकरीला आहेत. गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ते पत्नी आणि मुलासह नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले होते. आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गाडी आली असता, हिना व तिच्या इतर दोन साथीदारांनी त्यांना अडवले कोयता काढून तु आम्हाला ओळखत नाही का, आमच्या सोबत हिना दिदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे. तिच्या परवानगी शिवाय वस्तीत गाडी आणायची नाही. अशी धमकी दिली. त्यावेळी घाबरून काची यांनी गोपनारायण याला ढकलून दिले. त्यानंतर हिना व तिच्या साथीदारांनी रात्री आठच्या सुमारास काची राहत असलेल्या परिसरात राडा घातला.

आवाज आल्याने काची यांच्या घरातील लोकांनी बाहेर येऊन पाहिले. तुमचा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा करत आज त्याला जिवंत सोडणार नाही, असा दम दिला. तसेच फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्यावर तलावर,कोयत्याने मारले. तसेच परत जाताना परिसरातील लोकांना आमचे ऐकत नसाल तर एकेकाला खल्लास करून टाकू अशी धमकी देत हातातील शस्त्रे हवेत फिरत दहशत निर्माण केली. घाबरलेल्या लोकांनी घराच्या-खिडक्या व दरवाजे बंद केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.