पुण्यावर नव्या कोरोना विषाणूचं संकट ? UK तून परतलेले 2 जण पॉझिटिव्ह, 106 जण बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकुळ घातला आहे. हा नवा विषाणू आधीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. इंग्लंडमधून पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

दुसरीकडे, इंग्लंमधून पुण्यात परत आलेल्या प्रवाशांची संख्या 638 वर पोहचली आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे यातील 106 जणांचा पत्ता सापडत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 106 प्रवाशांचा तपास घेण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेतली आहे. तसे पत्र आरोग्य विभागाने पोलिसांना दिले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 60 हजार 758 रुग्णांपैकी 3 लाख 44 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 7 हजार 161 आहे. कोरोना बाधित एकूण 8 हजार 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.