अंदमानला ‘पाबूक’ चक्रीवादळाचा धोका ; अलर्ट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहाच्या दिशेने ‘पाबूक’ हे शक्तीशाली चक्रीवादळ येत असल्याने या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान आणि बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागात ताशी ७०-९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पाबूक हे वादळ पोर्टब्लेअर पासून सुमारे ६५० किलोमीटर दूरवर थायलंडजवळ घोंघावत आहे. ते सध्या पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकले असून ते अंदमानला धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ अंदमान आणि बंगालच्या उपसागरात पोहचल्यानंतर त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यासाठी अंदमानमधील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी जावे तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
या चक्रीवादळामुळे अंदमान तसेच बंगालच्या उपसागरातील पूर्व-मध्य आणि दक्षिण पूर्व भागातील समुद्र ७ जानेवारीपर्यंत खवळलेला राहील, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या वादळाच्या धोक्याबद्दल गृह मंत्रालयानेही दक्षतेचा इशारा दिला आहे.
मागील महिन्यात आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर फेथाई चक्रीवादळ धडकले होते.  बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा  निर्माण झाल्यामुळे हे फेथाई चक्रीवादळ निर्माण  झाले आहे.
चक्रीवादळ –
चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते.सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात.