वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्याआधीच ‘दक्षिण आफ्रिके’ला मोठा ‘धक्का’

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. सर्वच संघ यासाठी जोरदार तयारी करत आहेत. मात्र या सगळ्यात उद्घाटनाचा सामना खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी झटका देणारी बातमी समोर आली आहे. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन बाहेर पडला आहे. त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो इंग्लंड विरुद्धचा सामना खेळण्यास पूर्ण फिट नसल्याचे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी सांगितले आहे.

मुख्य स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना गिब्सन यांनी सांगितले कि, तो उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल, दुखापतीतून तो अजून पूर्ण बाहेर आलेला नाही. यावर पुढे ते म्हणले कि, तो पहिल्या सामन्यासाठी आमच्याकडे उपलब्ध नसला तरी आमच्या या १४ खेळाडू आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. डेल स्टेन याला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोर कडून खेळताना दुखापत झाली होती.

स्टेनप्रमाणेच विश्वचषकाच्या आधी दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि कागिसो रबाडा या दोन गोलंदाजाना दुखापतीचा सामना करावा लागला होता. मात्र विश्वकप सुरु होण्याआधी ते तंदुरुस्त झाले असल्याने आफ्रिकेची चिंता मिटली आहे. डेल स्टेन हा दक्षिण आफ्रिकेचा मुख्य गोलंदाज असून त्याने आत्तापर्यंत १२५ वनडे सामने खेळले असून यात त्याने १९६ विकेट्स घेतल्या आहेत.