डीएसकेंच्या मेहुणीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील नामवंत डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी सुरु करण्यात आली होती. डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना बेड्या ठोकल्या.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार , डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेंचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अनुराधा पुरंदरे गायब झालया होत्या . तपास पथकांना सापडत नव्हत्या. पण त्या निगडीमध्ये एका कुटुंबीयांकडे राहत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्यांना आज अटक केली.

नातेवाईक गोत्यात ,आतापर्यंत सात जण अटकेत

या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर ही सातवी अटक आहे. याआधी डी एस कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे (जावई), डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर आणि फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर मुलगा शिरीष कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 5 जूनला सुनावणी होणार आहे.