विहिरीत सापडला सिमेंटच्या खांबाला बांधलेला मृतदेह   

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा-मेलाणे रस्त्यावर मेलाणे शिवारात एका शेतातील विहिरीत ४५ ते ५० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सिमेंटच्या खांबाला बांधलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला असून दुसरीकडे खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होणार आहे. तुर्त याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरडाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश मिळवले आहे. हुस्नोद्दीन शेख शिराउद्दीन (४८) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो नरडाणा गावातील रहिवासी असून अविवाहित होता. शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. त्यामुळे प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हा खुनाचा प्रकार वाटत असला तरी अहवालानंतरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सपोनि योगेश राजगुरु यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, नरडाणा-मेलाणे रस्त्यावरील भिका हरचंद पाटील यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलिस उपनिरीक्षक मुकेश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत कमरे इतकेच पाणी असल्याने काही ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

मृतदेह एका सिमेंटच्या खांबाला तारेच्या सहाय्याने बांधलेला आढळून आला. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने भेट दिली. संबंधित व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद असल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात ठेवला आहे. याप्रकरणी माजी पोलिस पाटील जिजाबराव बापू सिसोदे (६२) यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

‘त्या’ खुन प्रकरणात होयकोर्टाने मागितले पोलीस अधीक्षकांना (SP) उत्तर