येरवडा कारागृहातील कैद्याचा झाडावरून उडी मारल्याने मृत्यू

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने झाडावरून उडी मारल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज (बुधवारी) दुपारी त्याला ससून रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , गणेश भीमराव खरात (वय ३०) असे मयत कैद्यांचे नाव आहे. मयत गणेश हा कोपरगाव दुय्यम कारागृह ,अहमदनगर येथील कैदी होता. या कैद्यास १० एप्रिल २०१८ रोजी पासून कोपरगाव येथून येरवडा कारागृहात वर्ग केले होते. दि. २४ एप्रिल २०१८ पासून कैद्यास कारागृहातील हॉस्पिटल विभाग ,मनोरुग्ण वार्ड २ मध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले होते. आज (बुधवार) सकाळी कैदी स्वतःहून वॉर्ड समोरील अंघोळीच्या हौदाजवळील वडाच्या झाडावर चढला आणि त्याने खाली उडी घेऊन खाली पडल्याने त्याला गंभीर इजा झाली होती. यानंतर ताबडतोब रुग्णालयातील वैद्यकीय विभागात अधिकऱ्यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी कारागृहाच्या रुग्णवाहिकेने ससून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना कैद्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉ. प्रवीण देवकाते यांनी घोषित केले. यानंतर कारागृह हवालदार रमेश शिंदे यांनी ही माहिती कारागृहास कळवली. कारागृह प्रशासनाने मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवाल मागितला आहे.

दरम्यान , कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपचारासाठी आणलेला कैदी झाडावर चढून उडी मारेपर्यंत त्याच्याकडे कुणाचेच लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न समोर येत आहे.