पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह 40 KM अंतरावर सापडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या नागरिकाचा मृतदेह आज तब्बल 40 किलोमीटर लांब असलेल्या अमरावती जिल्ह्यातील टाकळी गिलबा परिसरात आढळून आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील भुलोडा परिसरात बाबूलाल खडसे वाहून गेले होते.

वापटी कुपटी इथले खडसे हे 12 जूनच्या रात्री 8 वाजताचा सुमारास घरी चालले होते. त्यावेळी भूलोडा नजीकच्या नाल्याला पूर आलेला होता. त्या नाल्याच्या पुलावरून मोटारसायकलने पुढे जात असताना अंधारामुळे खडसे यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पुरात वाहून गेले. त्यांच्या सहकार्‍यांनी खडसे यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली.

त्यांनतर काही अंतरावर बाबुलाल यांची मोटारसायकल सापडली होती. मात्र त्यांचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता. अखेर आज बाबुलाल खडसे यांचा मृतदेह घटनास्थळापासून 40 किलो मीटर दूर असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी गिलबा परिसरातील नाल्यात आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईकांनि तिथेच अंत्यविधी उरकला.