धक्कादायक…..मुलाच्या मृतदेहाशेजारी 3 दिवस बसून असलेल्‍या आईचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन

मागील तीन दिवसांपासून घरात मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून राहिलेल्या मनोरुग्ण आईचा देखील घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुढीलेन येथील शालिग्राम तुळशीराम बाखरे यांचा तीन दिवसापूर्वी अज्ञात कारणाने मृत्यू झाला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाखरे हे पडेगाव येथील पावर हाऊसच्या मागे असलेल्या गणेश नगरात गेल्या 20 वर्षांपासून राहात होते. प्लॉटवर 20 बाय 30 बांधलेल्या घरात मनोरुग्ण असलेल्या आईसोबत राहून मोलमजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. तीन दिवसांपूर्वी घरातच अज्ञात कारणाने त्यांचा अचानक मृत्यू झाला.

मनोरुग्ण असलेल्या त्यांच्या आई देवकाबाई तुलशीराम बाखरे (90) यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले नाही. त्या तीन दिवसांपासून मृतदेहाशेजारीच पडून होत्या. जेव्हा सोमवारी सकाळी शेजार्‍याचा मुलगा त्यांना भाकरी घेऊन गेला तेव्हा ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी उपचारासाठी त्‍यांना तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.