कर्जमाफी फक्त तात्पुरता दिलासा देणारी बाब, पण शाश्वत नाही : उपराष्ट्रपती 

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन
देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा पुरेसा पर्याय नाही. कर्जमाफी ही फक्त तात्पुरता दिलासा देणारी बाब आहे मात्र शाश्वत नाही असे मत उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी व्यक्त केले. ते पुण्यातील वैंकुठ मेहता नॅशनल इन्सिट्यूट आॅफ को- आॅपरेटिव्ह संस्था येथील शाश्वत शेती बनविण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, एम. एस. स्वामिनाथन आदी मान्यवर उपस्थित होते.
एकंदर शेती व शेतकऱ्यांचा विचार केला तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कारण डाॅक्टर, अभिनेत, इंजिनीअर हे त्यांच्या मुलाला त्यांचा उद्योग करायला सांगतात. मात्र शेतकरी हा त्याच्या मुलाला कधीच शेतकरी हो असे सांगत नाही.कारण आज शेती दुष्काळ, बाजार भावची नसलेली हमी, करावा लागणारा खर्च, त्या तुलनेत न निघणारे उत्पन्न यामुळे शेती परवडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्याने योग्य ती धोरणे आखावे लागतील असेही नायडू यांनी म्हटलं आहे.
शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो कधीही कर्जमाफी मागत नाही. मात्र त्यासाठी त्याला सुविधा देणे गरजेचं आहे.त्याला गरजेपुरती वीज द्या, तीही फुकट नको पण लागेल तेवढे द्या, तसेच पाण्याबरोबर माती परीक्षणाची सुविधा देखील पुरवा.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. भारत हा शेतीमालाची निर्यात करणारा देश आहे. मात्र शेतकऱ्यांना सुविधा आणि बाजारभावाचे अवमूल्यन यामुळे शेतकरी मागे पडत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.