लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूला 7 दिवसांची पोलिस कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनादरम्यान 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी हिंसक वळण मिळाले. अभिनेता दीप सिद्धू हा त्यामागचा मुख्य आरोपी आहे. आज त्याला तीस हजारी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात शेकडो पोलिस जखमी झाले. त्यामुळे या आंदोलनावर विविध स्तरावरून टीका केली जात होती. या हिंसाचाराच्या आरोपावरून दीप सिद्धूला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांकडून त्याला 10 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्याला 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या सुनावणीदरम्यान तीस हजारी न्यायालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

लाल किल्ल्यावर पोहोचण्यासाठी लोकांना कसं बोलावलं?

दीप सिद्धूला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये लाल किल्ल्यावर पोहोचण्यासाठी लोकांना कसं बोलावलं, योजना कशी बनवली, त्याच्या मोबाईल नंबरसंदर्भातही माहिती घेण्यात आली.

दीप सिद्धू 15 दिवसांपासून फरार

26 जानेवारीला हिंसाचार झाल्यापासून दीप सिद्धू फरार होता. त्यानंतर आज (मंगळवार) त्याला पंजाबच्या जिकरपूर येथून अटक करण्यात आली. दीप सिद्धू हा पूर्णिमा येथे जाण्याच्या विचारात होता. पण तत्पूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली.

लॉकडाऊनपासून नाही हातात कोणतेही काम

लॉकडाऊनदरम्यान आणि नंतर दीप सिद्धू याच्याकडे कोणतेही काम नव्हते. ऑगस्टमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचे आंदोलन पंजाबमध्ये सुरु झाले, तेव्हा तो आकर्षित झाला होता.