दिपक मानकर यांच्या साथिदारांना २६ पर्यंत पोलीस कोठडी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन-गन मॅन शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी मोक्का कायद्याखाली अटकेत असलेले दिपक मानकर व त्याचे ७ साथीदार यांना शिरसेकर कोर्टाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणात पुणे पोलीसांनी अत्यंत कुशलतेने या सर्व आरोपींची पोलीस कोठडी राखीव ठेवली होती. सध्या दिपक मानकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याची कोठडी ऱाखीव ठेवण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप (वय-५३ रा. घोरपडे पेठ) यांनी घोरपडी परिसरात रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा. मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा. शांतीनगर येरवडा), नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती तर मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून दीपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र तीन खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली होती. सलग तीनवेळा उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शवल्याने मानकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर व पुढील १० दिवसांत त्यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिल्यानंतर १ ऑगस्ट रोजी ते पोलिसांसमोर हजर झाले. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.