संरक्षण विभागाचा निर्णय ! देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होणार, 11 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुदत संपलेल्या पुणे, खडकी, देहूरोड सहित राज्यातील 7 व देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 11 फेब्रुवारीपासून होणार आहे. संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. याला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ अमितकुमार यांनी देखील दुजोरा दिला आहे.

10 फेब्रुवारी 2015 ला हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड अस्तित्वात आले होते. त्यानुसार 10 फेब्रुवारी 2020 ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात 6 महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे 6-6 महिन्यांचा दोन मुदतवाढ मिळाल्या होत्या. सदर मुदत येत्या 10 तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार सर्व कॅन्टोमेंट बोर्डाला तसे अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यातील तरतुदीनुसार जेंव्हा बोर्ड बरखास्त केले जाते. तेंव्हा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व मुख्यकार्यकारी अधिकारी या द्विसदस्यीय समितीमार्फत चालतो किंवा बोर्डावर प्रशासक म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा संरक्षण मंत्रालय नेमू शकते. अशावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष लोकप्रतिनिधी व मुख्यकार्यकारी अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो.

सध्या देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती पाहता निवडणूक घेणे प्रशासनाला परवडणारे नाही. त्यामुळे द्विसदस्यीय किंवा लोकांतील प्रतिनीधीद्वारे त्रिसदस्यीय समिती स्थापन होण्याची दाट शक्यता आहे.