Delhi Blast : घटनास्थळी आढळले पत्र; सांगितले स्फोटामागचे कारण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्ली, मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांकडून तपास युद्धपातळीवर सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान घटनास्थळी एक पत्र मिळाले असून, या पत्रात स्फोटामागचे कारण दिले गेले आहे.

तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून एक पत्र आणि अर्धवट जळालेली एक गुलाबी ओढणी मिळाली. या पत्रात लिहिले होते, की ‘आम्ही सर्वसामान्य जनतेला नुकसान पोहोचविण्यासाठी स्फोट घडवून आणला नाही. आम्ही फक्त आपला मेसेज देऊ इच्छितो. हा एक ट्रेलर आहे बास…’ याशिवाय पोलिसांच्या हाती 3 दिवसांची रुट सेल आयडी म्हणजे डंप डाटा लागला आहे. या डाटाच्या माध्यमातून ही बाब समोर आली, की स्फोटावेळी त्या परिसरात तब्बल 45 हजार मोबाईल फोन्स सुरु होते.

गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास
गुन्हे शाखेचे एक पथकही दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास करत आहे. हे पथक कॅबच्या पिक अँड ड्रॉपवर काम करत आहे. स्फोटापूर्वी अब्दुल कलाम रोडवर 3 तासांपर्यंत कोणत्या लोकांना घेतले अथवा सोडले त्याचा तपास आता केला जात आहे.

ओला, उबेरकडे संपर्क
ओला, उबेर या कंपनीकडे संपर्क केला जात आहे. त्यांच्याकडेही 29 तारखेला 3 पासून ते 6 वाजेपर्यंत गेलेल्या वाहनांची माहिती घेतली जात आहे.