Lockdown : फाड पावती, माझा बाप पण पोलिस आहे, महिलेनं घातला वाद अन् पुढं झालं असं काही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिवसेंदिवस संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर, बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज रात्री १० पासून पुढच्या सोमवारपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. दिल्ली याआधी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. परंतु, कोरोनाचा प्रार्दुभाव नियंत्रणात आला नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. विकेंड लॉकडाऊन असतानाही लोकं मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळत होती.

विकेंड लॉकडाऊन असतानाही विनाकारण दिल्लीच्या रस्त्यावर गाडीनं फिरणं एका दाम्पत्याला महागात पडलं. लॉकडाऊनचं पालन सक्तीनं करण्यासाठी पोलिस सज्ज आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या दरियागंज परिसरात पोलिसांनी विनाकारण गाडीने फिरणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई केली आहे. पोलिसांसोबत असभ्य वर्तवणूक केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. प्रकाराला स्वत:च्या पत्नीला जबाबदार धरलं आहे.

या दाम्पत्याला पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर कारमधील महिलेने पोलिसांसोबत गैरवर्तवणूक केली. त्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिसांनी जेव्हा मास्क न घालण्याचं कारण महिलेला विचारलं तर त्या महिलेने वडील पोलिस खात्यात असल्याचं बतावणी केली. पोलिसांनी हुज्जत घालत “फाडा माझी पावती, माझा बापपण पोलिसमध्ये आहे”, असं ओरडताना दिसून आली. या संपूर्ण प्रकारानंतर महिलेच्या पतीला अटक करण्यात आली तेव्हा त्याने सर्व दोष पत्नीवर टाकला. आरोपीने सांगितले की, “माझ्या पत्नीला मास्क लावण्यासाठी सांगितलं परंतु तिने स्वत:ही मास्क घातलं नाही आणि मलाही मास्क लावू दिला नाही.” आरोपी पतीने घडलेल्या प्रकाराबाबत पत्नीला दोषी ठरवलं. आरोपी पतीचं नाव पंकज दत्ता आहे आणि पत्नीचं नाव आभा दत्ता आहे. आरोपीने पत्नीने खूपच पोलिसांसोबत गैरवर्तवणूक केल्याचं म्हटलं. पत्नीनेच मला पोलिसांसोबत हुज्जत घालण्यासाठी भडकवलं असल्याचं तो म्हणाला.

या व्हिडीओत महिला पोलिसांना माझा बाप पोलिस आहे असं सांगत असल्याचं दिसून येते. महिला पोलिसांना अश्लिल शिवीगाळ आणि अपशब्द वापरत असल्याचं ऐकायला येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याकडे कर्फ्यूमध्ये फिरण्याचा कोणताही पास नव्हता. चेहऱ्यावर मास्क घातला नव्हता. इतकचं नाही तर ती महिला पोलिसांना दमदाटी करत कोरोना नाही सर्व नौटंकी असल्याचा दावा करत होती.