Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत 106 जणांना अटक, 18 FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्या (CAA) च्या विरोधात दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाने हिंसाचारग्रस्त भागात मोर्चा काढला. हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बुधवारी निवेदन देऊन दिल्लीकरांना शांततेचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील याबाबतीत कार्यरत असून त्यांनी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीला भेट दिली आणि लोकांशी संवाद साधला.

दिल्ली पोलिसचे पीआरओ एमएस रंधावा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत १०६ लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच १८ लोकांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आली आहे. तसेच ते म्हणाले की सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई सुरू आहे. हिंसाचारग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षण केले जात आहे. ते म्हणाले की ज्यांच्या छप्परांवर दगड दिसतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान दिल्ली हिंसाचार मध्ये ठार झालेले अंकित शर्मा यांच्याबाबत भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की असा साहसी गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे. त्याबाबत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना कठोर सजा देण्यात यावी. स्वर्गीय शहीद अंकित शर्मा यांचे बलिदान वाया जाणार नाही. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच दिल्ली सरकारकडून शहीद रतन लाल यांच्या परिवारास १ कोटी रुपये आणि परिवाराच्या एका सदस्याला नोकरी देण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

ईशान्य दिल्लीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून देखरेख करण्यात येत आहे. तसेच एनएसए अजित डोभाल स्थानिक लोकांसोबत संवाद साधत आहेत. डोभाल म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागातील सर्व लोक शांततेबद्दल चर्चा करत आहेत. तसेच ते म्हणाले की गुन्हेगार हिंसाचार पसरवत असतात. लोक अशा गुन्हेगारांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित असून आपले काम योग्यरीत्या पार पाडत आहेत. आम्ही पीएम आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावर इथे उपस्थित आहोत. लवकरच शांततेचे वातावरण होईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच डोभाल म्हणाले की, या देशावर जो कुणी प्रेम करतो त्यांना माझा संदेश आहे की त्यांनी समाजावर आणि आपल्या शेजारच्यावर देखील प्रेम करावे. सर्वांनी शांततेत राहावे. लोकांनी एक दुसऱ्याच्या समस्यांचे निरसन करावे.

दरम्यान दिल्लीतील दंगलीप्रकरणी चिथावणीखोर निवेदनासाठी एफआयआर दाखल करण्याशी संबंधित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना गुरुवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या निर्देशानंतर दिल्ली पोलिस आयुक्त गुरुवारी सर्व व्हिडिओ पाहतील आणि उत्तर देतील. द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर दिल्ली पोलिस आयुक्त उच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल करणार आहेत. उच्च न्यायालय गुरुवारी दुपारी २:१५ वाजता पोलिसांचे उत्तर ऐकणार आहेत.