जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करा : विश्वस्त मंडळाची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी विश्वस्त मंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप व विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली.

कोरोनामुळे खंडोबाचे मंदिर 18 मार्चपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जेजुरीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. येथील सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपजीविका येथे येणार्‍या भाविकांवर अवलंबून आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने खंडोबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्याची आवश्यकता असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. राज्यसरकारने मंदिर उघडण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती शासनाला करण्यात येणार आहे. भाविकांच्या देवदर्शनासाठी शासनाकडून येणार्‍या सर्व आदेश व नियमांची योग्य अंमलबजावणी करून भाविकांना सोशल डिस्टंसिंग पाळून दर्शन देऊ अशी भूमिका विश्वस्त मंडळाने घेतली आहे. खंडोबा हे अठरापगड जातींचे कुलदैवत असल्याने घरात लग्नकार्य झाल्यावर जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेण्याची अनेक घराण्यांमध्ये प्रथा आहे. मंदिर बंद असल्याने येथे येणार्‍या भाविकांना प्रतिबंध केला जात आहे. त्यातूनही काही नवविवाहित जोडपी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून खंडोबा गडाच्या पायरीजवळ येऊन भंडारा उधळून जाताना दिसत आहेत. भाविकांना तेथील देवाचे दर्शन होत नसल्याने आता सर्वच स्तरांतून ही मंदिरे उघडण्याची शासनाकडे मागणी वाढत आहे.